नगर संवाद शेतमालाला नसलेला बाजारभाव, वाढता उत्पादन खर्च आणि वेळोवेळी आलेली नैसर्गिक संकटे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स...
नगर संवाद
शेतमालाला नसलेला बाजारभाव, वाढता उत्पादन खर्च आणि वेळोवेळी आलेली नैसर्गिक संकटे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झालेली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी करावी आणि उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा अशी मागणी खडकी तालुका अहिल्यानगर येथील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कृषी मंत्री पुणे येथे असताना खडकी तालुका अहिल्यानगर येथील सरपंच भाऊसाहेब बहिरट, नंदू रोकडे. कैलास कोठुळे ,अशोक रोकडे, बापू कोठुळे आदी शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी काय आहेत याची माहिती कृषिमंत्री यांनी शेतकऱ्यांना विचारली. दूध व्यवसाय,फळबाग व्यवसाय आणि जिरायती शेतकऱ्यांसमोरील अडचणी शेतकऱ्यांनी कृषिमंत्री यांना सांगितल्या. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यानुसार बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत नाही. ज्यावेळी शेतकरी धान्य विकतो त्यावेळी बाजारभाव पडलेले असतात. आर्थिक अडचणीमुळे धान्य विकण्याशिवाय त्याच्यासमोर पर्याय नसतो पण ज्यावेळी व्यापाऱ्यांच्या गोडाऊन मध्ये धान्य असते त्यावेळी वाढलेल्या बाजारभावांचा व्यापाऱ्यांना फायदा होतो. कष्ट करूनही शेतकरी उपाशीच राहतो. दूध व्यवसाय मध्ये जनावरांच्या खाद्याच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पण आजमितीला दुधाचा दर लिटरला 34 रुपयांच्या आसपास आहे. हा दर किमान 40 रुपयांच्या असेल तरच दूध धंदा टिकेल असेही शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच बनावट दूध करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी . कांद्याचे बाजार आता 10 ते 12 रुपये किलो आहेत त्यामुळे कांदा पिकात शेतकरी तोट्यात गेला आहे. त्यांनाही किलोमागे 15 रुपये अनुदान द्यावे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला हवीभाव द्यावा . बिबट्यांच्या भीतीमुळे शेतीला आठ तास दिवसा वीजपुरवठा करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आली.
कृषिमंत्र्यांचे आश्वासन
कर्जमाफी बाबत सरकार सकारात्मक आहे. शेतकरी आणि शेती व्यवस्था टिकण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी शिष्टमंडळाला दिले.
COMMENTS