नगर संवाद श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील वारकऱ्यांनी सायकलवरून नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अहिल्यानगर ...
नगर संवाद
श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील वारकऱ्यांनी सायकलवरून नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
श्रीक्षेत्र हंगेवाडी येथील ह.भ.प. मच्छिंद्र महाराज रायकर व ह.भ.प. बाबासाहेब गिरमे यांनी सायकलवरून सुमारे ५ हजार किलोमीटरचा प्रवास करत अवघ्या ५० दिवसांत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. या कालावधीत त्यांनी दररोज किमान १०० ते १२५ किलोमीटरचे अंतर पार करत आपली परिक्रमा यशस्वी केली. परिक्रमेच्या दरम्यान त्यांनी मार्गावरील विविध मंदिरे, आश्रम व देवस्थाने यांचे दर्शन घेतले.
हा प्रवास जंगल भागातून झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऊन, वारा, थंडी तसेच शारीरिक कष्ट असूनही त्यांनी कोणतीही तक्रार न करता अत्यंत श्रद्धा, संयम व आत्मविश्वासाने हा खडतर प्रवास पूर्ण केला.
परिक्रमा पूर्ण करून परतीच्या प्रवासात असताना कामरगाव येथे त्यांचे आगमन होताच ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी सोसायटीचे चेअरमन सुदामराव ठोकळ, स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ पोटे तसेच माजी सरपंच तुकाराम कातोरे यांच्या शुभहस्ते फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
उल्लेखनीय बाब म्हणजे, श्रीक्षेत्र हंगेवाडी हे कर्जत तालुक्यातील मांदळी येथील आत्माराम गिरी बाबांचे जन्मस्थळ असून, त्यांच्या प्रेरणा व आशीर्वादानेच हे वारकरी नर्मदा परिक्रमेसाठी मार्गस्थ झाले होते.
या सत्कार समारंभास वन्यप्राणी संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे, मेजर नाभिक संघाचे अध्यक्ष शामराव जाधव, सावता परिषदेचे अध्यक्ष दीपक चौरे, दत्तात्रय गायकवाड, सिद्धी चौरे, नाथाभाऊ पाडेकर, आसाराम आंधळे, पोपटराव कातोरे, तबाजी साठे, पाराजी ठोकळ, सोनबा ठोकळ, गंगाधर भुजबळ, चंद्रकांत साठे, मुरलीधर ठोकळ, रमेश केदारे, राजेंद्र कातोरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला-पुरुष वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आयोजन व नियोजन दीपक चौरे व राजाभाऊ पोटे यांनी केले.
COMMENTS