नगर संवाद अहिल्यानगर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. अनेक पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्...
नगर संवाद
अहिल्यानगर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. अनेक पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडलेल्या आहेत. बिबट्याचा वावर मानव वस्तीत आढळून येत आहे. बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली असून शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी मजले चिंचोली ग्रामपंचायतच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मजले चिंचोली पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना बुधवार (दि.१९) रोजी निवेदन देण्यात आले आहे. मजले चिंचोली व परिसरातील गावांमध्ये वारंवार बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार देखील करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. बिबट्या मुळे गावातील शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी देण्यास व मशागतीस जाण्याची भीती वाटत आहे.
रब्बी हंगामातील सर्वच पिकांना सद्यस्थितीत पाणी देण्याची गरज आहे. परंतु दिवसा वीज पुरवठा नसल्याने रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतामध्ये जावे लागत आहे. बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. मजले चिंचोली गावच्या हद्दीच्या सीमेलगत वनविभागाचे मोठे क्षेत्र असून या परिसरातही बिबट्यांचा वावर नेहमीच आढळून आलेला आहे.
दोन दिवसांपूर्वी मजले चिंचोली येथील देवराम आव्हाड या शेतकऱ्याच्या वासराची शिकार बिबट्याकडून करण्यात आली होती तर मागील आठवड्यात खोसपुरी येथे शेळीच्या शिकारीची देखील घटना उघडकीस आली आहे. या घटना घडल्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये देखील भीतीचे निर्माण वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वारंवार या परिसरामध्ये भर दिवसा बिबट्याचे दर्शन होत आहे.
बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी अमित आव्हाड, महेश आव्हाड, सरपंच अमोल आव्हाड, अंकुश आव्हाड, करीम बेग, सोमनाथ पालवे, ज्ञानेश्वर आव्हाड, बबनराव आव्हाड यांच्यासह खोसपुरी, मजले चिंचोली, आव्हाडवाडी, उदरमल, पांगरमल, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
___________________________
मजले चिंचोली शिवारात बिबट्याने वारंवार दर्शन दिलेले आहे. मानव वस्तीत बिबट्याकडून पशुधनाच्या शिकारीच्या घटना घडलेल्या आहेत. शेतामध्ये रात्री पिकास पाणी देताना शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. तरी शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची गरज आहे.
......महेश आव्हाड ( मजले चिंचोली )
_______________________
खोसपुरी, मजले चिंचोली, उदरमल, आव्हाडवाडी, पांगरमल या गावांच्या सीमेलगत नगर व पाथर्डी तालुक्यातील वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात येते. मोठ्या प्रमाणात असलेल्या डोंगर रांगांमुळे बिबट्यांची संख्या देखील जास्त आहे. बिबट्याचा वावर वारंवार आढळून आल्याने शेतकरी, ग्रामस्थांनी विशेषतः लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा. यासाठी ना. राधाकृष्ण विखे, सुजय विखे,अक्षय कर्डिले यांच्याकडे देखील मागणी करण्यात आली असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
...... अमित आव्हाड
COMMENTS