सावधान.... ते तुमची वाट पाहत आहेत

सावधान.... ते तुमची वाट पाहत आहेत

नगर संवाद 
सध्या भारतातच नव्हे तर जगात ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. डिजिटल बँकिंग, ऑनलाईन शॉपिंग, युपीआय व्यवहार, सोशल मीडियावर संवाद – हे सर्व सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. मात्र या डिजिटल विस्तारामागे एक भीषण सावली आहे – ती म्हणजे ऑनलाईन फसवणूक अर्थात सायबर फ्रॉड.
गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. ओटीपी मागून पैसे गायब करणे', 'केवायसी अपडेटच्या नावाखाली खाते रिकामे करणे', 'फेक लॉटरी किंवा बक्षिसाचे आमिष', 'जॉब ऑफरच्या नावाने पैसे उकळणे', 'फेक लिंकवर क्लिक करून माहिती चोरणे' – असे असंख्य प्रकार सर्वसामान्य लोकांना आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या पोखरत आहेत.
अनेकांना ‘तुमचे खाते बंद होणार आहे’, केवायसी अपडेट करा’, ‘लॉटरी जिंकली आहे’ असे मेसेजेस येतात. त्यानंतर OTP मागून सायबर गुन्हेगार संपूर्ण बँक खाते रिकामे करतात. बँकेच्या किंवा सरकारी खात्याच्या नावाने आलेले कॉल खरे वाटतात. कॉलर आयडी स्पूफिंगद्वारे खोटे क्रमांक दाखवले जातात. त्यामुळे लोक सहज विश्वास ठेवतात.  ऑनलाईन शॉपिंगसाठी बनवलेल्या बनावट वेबसाइट्सवरून ग्राहकांनी पैसे भरले तरी वस्तू मिळत नाहीत. तसेच, फेक लिंकवर क्लिक केल्याने मोबाइल/लॅपटॉप हॅक होतो.

अजय नावाची व्यक्ती आय टी प्रोफेशनल आहे. त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये सुद्धा त्यांची मोठी उलाढाल आहे. त्यांना एलआयसीचा  तुम्ही या क्रमांकाच्या पॉलिसीचा प्रीमियम भरलेला नाही असा मेसेज आला. त्यांनी त्या लिंकवर क्लिक केले. मोबाईल हॅक झाला. परंतु अजयच्या लक्षात आलेच नाही. हॅकर्स सावकाशपणे त्यांच्या खात्यामधून 3000, 5000 अशा रक्कम काढत होते. अजयची उलाढाल मोठी असल्यामुळे त्यांना बँकेतून रक्कम काढली जात आहे हे लक्षात आले नाही. 
एक दिवस अचानक त्यांच्या खात्यातून तीस हजार रुपये काढले गेले. काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आल्यानंतर तोपर्यंत खात्यातून एक लाखाच्या वर रक्कम काढली गेलेली होती. 
अजयने सायबर क्राईमला ऑनलाईन कळवले. तक्रारही दाखल झाली. अजयने त्वरित आपला मोबाईल फॅक्टरी रिसेट करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या मोबाईल मधील डेटा त्याच्या वडिलांच्या मोबाईल मध्ये घेतला. स्वतःचा मोबाईल रिसेट करून पुन्हा वडिलांच्या मोबाईल मधून त्याचा डेटा स्वतःच्या मोबाईल मध्ये घेतला. काही दिवसानंतर अजयच्या वडिलांच्या फोन पे खात्यामधून काही ट्रांजेक्शन झाले. अजयच्या वडिलांच्या खात्यातून 90 हजार गायब झाले होते. अजयने वडिलांचाही मोबाईल फॅक्टरी रिसेट केला आणि वडिलांच्या मोबाईल मधील सर्व डेटा आपल्या पत्नीच्या मोबाईलवर घेतला. काही दिवसांनी अजयच्या पत्नीच्या गुगल पे मधून सुद्धा पेमेंट गेले. तिच्याही खात्यामधून 80 हजार रुपये गेले होते. अजयच्या मोबाईल मध्ये एलआयसी मेसेज द्वारे डाऊनलोड झालेल्या हॅकर्सच्या मालवेअर फाईल अजयच्या वडिलांच्या मोबाईल मध्ये गेल्या होत्या आणि त्याच नंतर पत्नीच्याही मोबाईल मध्ये त्या फाईल डाऊनलोड झाल्या होत्या. 
काही दिवसांनी अजयच्या शेअर मार्केटच्या एंजल वन च्या अकाउंट मधून हॅकर्सने तीस हजार रुपये विड्रॉल केले. ते अजयच्या बँक खात्यात आल्यानंतर यूपीआय द्वारे काढून घेण्यात आले. त्यानंतर लगेच अजयच्या एसबीआय क्रेडिट कार्ड द्वारे 25 हजार रुपये अजयच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झाले. तेही यूपीआय द्वारे काढून घेण्यात आले. ही बाब अजयच्या लक्षात आल्यानंतर त्याने सर्व मोबाईल डेटा फॅक्टरी रीसेट केले अजयच्या आणि त्याच्या वडिलांच्या पत्नीच्या बँक खात्यातून चार लाखाची रक्कम हॅकर्सनी काढून घेतलेली होती.
सायबर गुन्हेगार आता केवळ पैसे चोरण्यावर थांबत नाहीत, तर तुमचं लक्षच जाऊ नये यासाठी अनेक क्लृप्त्या वापरत आहेत. त्यातील एक म्हणजे पेमेंट काढल्यानंतरही त्याचा कोणताही एसएमएस, अ‍ॅलर्ट, नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येत नाही. गुगल पे, फोन पे द्वारे हॅकर्सने पैसे काढून घेतल्यानंतर सुद्धा त्याच्या लॉगमध्ये पैसे डेबिट झाल्याचं दिसत नाही. मालवेअर किंवा रिमोट अ‍ॅक्सेस टूल (RAT) द्वारे हॅकर्स फोनवर पूर्ण नियंत्रण मिळवतात.

पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली. अजयने थोडे वजन वापरून गुन्हा दाखल केला. परंतु आज पाच महिन्यानंतर सुद्धा त्यावर कोणतीच हालचाल पोलिसांकडून झालेली नाही.

या फसवणुकी संदर्भात सरकारकडून रिंगटोन लावून जनजागृती केली जात असली तरी प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलला मात्र पोलिसांकडून याची दखल घेतली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. सायबर क्राईमशी संबंधित एका अधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी खाजगीत सांगितले की, अशा रोजच्या चार ते पाच घटना घडत असतात आणि हे हॅकर्स परराज्यातील असल्याने तपास करणे आणि मनुष्यबळ गुंतवणे शक्य होत नाही. 

ब्ल्यू फिल्म वेबसाइट्स किंवा पॉर्नोग्राफिक कंटेंट देणाऱ्या साईट्स सायबर फ्रॉडसाठी अतिशय धोकादायक ठरू शकतात. अशा साईट्सवर क्लिक केल्यावर काही लिंक्समुळे मालवेअर किंवा स्पायवेअर तुमच्या डिव्हाईसवर डाऊनलोड होऊ शकते. अनेक वेळा पालक आपल्या मुलांना मोबाईल गेम खेळण्यासाठी देतात. तेव्हा ही मुले विश्वासार्ह नसणाऱ्या स्टोअरमधून गेम डाउनलोड करतात आणि यामुळे सुद्धा मोबाईल हॅक होऊ शकतो.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI),   डीपफेक तंत्रज्ञान, आणि वर्चुअल रियालिटी यांचा वापर वाढत आहे, तसतसे सायबर फसवणुकीचे नवे प्रकार उदयाला येणार हे निश्चित. कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारे तयार केलेले बनावट व्हॉइस कॉल, चेहर्याचे व्हिडीओ क्लोनिंग हे सर्व प्रकार आजच्याच नव्हे तर उद्याच्या काळातल्या मोठ्या समस्या ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने डिजिटल व्यवहार करताना जागरूक राहणे, कोणत्याही ऑफरला किंवा कॉलला लगेच बळी न पडणे, आणि सतत स्वतःला माहितीने सज्ज ठेवणे हे काळाचे तितकेच मोठे आव्हान आहे. सायबर फसवणूक होताच ‘1930’ या हेल्पलाइनवर तात्काळ संपर्क साधल्यास काही रक्कम वाचवता येऊ शकते. आणि म्हणूनच सांगावेसे वाटते की सावधान ते तुमच्या एका चुकीची वाट पाहत आहेत...


संजय भास्करराव मोरे
शेअर मार्केट तज्ञ
आंतरराष्ट्रीय घडामोडी विश्लेषक

Post a Comment

Previous Post Next Post