नगर संवाद: आतंकवाद हा संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे संपूर्ण जगातील आतंकवाद हा संपलाच पाहिजे. भारतीयांवर पहेलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पापांचे बळी गेले. त्याचा बदला घेत भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी केले. भारतीय सैनिकांची कामगिरी संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन युवा नेते सुनील पवार यांनी केले आहे.
जेऊर येथे ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल फटाकडे वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना सुनील पवार यांनी सांगितले की, निष्पाप भारतीयांवर केलेला हल्ला हा निंदनीय होता. त्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्य दलाच्या वतीने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवत घेण्यात आला आहे. भारत देशात तसेच जगात आतंकवादी कारवाया वाढल्याने हे धोकादायक ठरत आहे. आतंकवादाला जात धर्म नसून तो मानवतेच्या विरोधात आहे. त्यामुळे आतंकवादाचे समुळ उच्चाटन होणे गरजेचे आहे.
ऑपरेशन सिंदूर राबवताना भारतीय सैन्य दलांकडून निष्पाप लोकांचा बळी जाणार नाही याची पुरेपूर दखल घेण्यात आली. यामध्ये अतिरेक्यांच्या तळांवर हल्ले करण्यात आले आहेत.भारतीय सैन्य दलाची कामगिरी कौतुकास्पद असून संपूर्ण देश सैन्य दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
जेऊर येथे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल फटाकडे वाजवून तसेच पेढे वाटून सैन्य दलाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक मधुकर मगर, माजी सरपंच शरद तवले, गणेश तवले, मुसा शेख, संजय मगर, गोरख तोडमल, डॉ. उदय मगर, दत्तात्रय आढाव, बबलू ठोंबरे, केरु भाऊजी मगर, किसन मंचरे, सागर ससे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_______________________________
भारत देशामध्ये आजवर आतंकवादी कारवायांमध्ये अनेक निष्पापांचे बळी गेलेले आहेत. आतंकवादाचे परिणाम सर्वाधिक आपल्याच देशाने भोगले आहेत. देशात शांतता राहावी यासाठी आतंकवादाचा समूळ नायनाट करण्याची हीच योग्य वेळ आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण देश सैन्य दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
...... मधुकर मगर ( संचालक, बाजार समिती)
Tags
अहिल्या नगर