नगर संवाद
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल उद्या 13 मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना उद्या दुपारी 1 वा. बोर्डाने निश्चित केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत आठवड्यातच इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतर विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दहावीचा निकाल केव्हा लागणार? याविषयीची उत्सुकता लागली होती. त्यानुसार, मंडळाने सोमवारी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार मंगळवारी दुपारी 1 वा. ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या व इतर अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुणपत्रिकांचे वाटप केले जाईल.
यंदा किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते?
यंदा दहावीच्या परीक्षेला 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसले होते. त्यात 8 लाख 64 हजार 120 मुले, 7 लाख 47 हजार 471 मुली, तर 19 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती.
11 वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार
दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालकांना अकरावीच्या प्रवेशासाठी तयारी करावी लागते. यासाठी त्यांना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात. पण मंडळाने यंदा त्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची माहिती बोर्डाने एका प्रसिद्धीपत्रकाराने यापूर्वीच दिली आहे.
Tags
अहिल्या नगर