नगर संवाद :कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार दि. ७ रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक सहभागी झाले होते.
कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कामकाजासाठी लॅपटॉप उपलब्ध करून द्यावा, कृषी सेवक कालावधी रद्द करावा, विभागाच्या आकृतिबंधामध्ये कृषी सहाय्यकांना योग्य न्याय द्यावा आणि निविष्ठा वाटपातील अन्याय दूर करून सुसूत्रता आणावी. या मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या.
आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने १५ मे पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष धनराज गुंड यांनी दिली. आंदोलनाची सुरुवात सोमवार दि.५ पासून करण्यात आली आहे.पुढील दहा दिवस आंदोलनाचे विविध टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.त्यामध्ये काळ्या फिती लावून निषेध, सर्व शासकीय व्हॉट्सअॅप समूहातून बाहेर पडणे, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, एक दिवस सामूहिक रजा, सर्व ऑनलाईन कामांवर बहिष्कार, सर्व योजनांचे काम बंद आंदोलन अशा पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
शासनाकडून वेळोवेळी आश्वासने देण्यात आली, मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता या टप्प्याटप्प्याने आंदोलनाची दिशा अधिक तीव्र केली जाणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.सदर आंदोलनास जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी उपसंचालक सागर गायकवाड उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी भेट दिली. कृषी सहाय्यक संघटनेच्या मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आश्वासन दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष धनराज गुंड, अहिल्यानगर तालुका अध्यक्ष युवराज शिंगटे, सचिव उमेश शेळके व तालुक्यातील व जिल्हा मुख्यालयातील सर्व कृषी सहाय्यक उपस्थित होते.
Tags
अहिल्या नगर