नगर संवाद - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने सन २०२३-२४ साठी ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ जाहीर केले असून यात रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १५१ गोल्ड व २५ सिल्व्हर मेडल मिळविणाऱ्या अहिल्यानगरच्या संयुक्ता प्रसेन काळे हिचा समावेश आहे. ३ लाख रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून राज्य शासनाचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ १८ एप्रिल रोजी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात पार पडणार आहे. या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल.कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर आणि क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे उपस्थित राहणार आहेत.
हा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झालेली संयुक्ता काळे ही मुळची नगर तालुक्यातील सारोळा कासार गावची रहिवासी आहे. ती गेल्या काही वर्षांपासून ठाणे येथे मुख्य प्रशिक्षक पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिने आतापर्यंत मध्य प्रदेश, हरियाणा, चेन्नई येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये १२ गोल्ड आणि २ सिल्व्हर मेडल मिळविले आहेत. तर गुजरात, गोवा, उत्तराखंड मध्ये झालेल्या नॅशनल गेम्समध्ये ८ गोल्ड व ३ सिल्व्हर मेडल मिळविले आहेत. या शिवाय पट्टाया, थायलंड येथे झालेल्या ११ व्या वरीष्ठ गट आणि १७ व्या तसेच १३ व्या वरीष्ठ गट आणि १८ व्या ज्युनियर एशियन रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये चॅम्पियनशिप मिळविलेली आहे. याशिवाय ताश्कंट वर्ल्ड कप २०२३, फ्रांस येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा अशा विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये आज पर्यंत १५१ गोल्ड व २५ सिल्व्हर मेडल मिळविले आहेत. तिने महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी केलेल्या या कामगिरीची दखल राज्याच्या क्रीडा विभागाने घेत तीला सन २०२३-२४ साठी ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ जाहीर केला आहे.
संयुक्ता हिच्या या यशात तिचे वडील प्रसेन काळे व आई अर्चना काळे यांचा मोठा वाटा आहे. दुर्दैवाने तिचे वडील प्रसेन काळे यांचे गतवर्षी निधन झाले. मात्र त्यानंतरही आई अर्चना काळे यांनी खचून न जाता संयुक्ता हिच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या आहेत.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झालेली जिम्नॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे ही सारोळा कासार मधील दिवंगत भूगर्भ शास्रज्ञ प्रतापराव काळे, कै.विक्रमराव काळे व रयत शिक्षण संस्थेचे माजी ऑडीटर प्राचार्य विश्वासराव काळे यांची नात आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Tags
अहिल्या नगर