नगर संवाद
साकळाई उपसा जलसिंचन योजनेची मुहूर्तमेढ पद्मश्री बाळासाहेब विखे यांनी रोवली. माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागील 3 वर्षात त्यासाठी विशेष प्रयत्न करत हा विषय ऐरणीवर आणला. 16 एप्रिल 2019 मधील वाळकी येथील जाहीर सभेतही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकळाई पूर्ण करणारच असे आश्वासन दिले होते. आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदी आहेत तर जलसंपदा खाते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे.त्यामुळे 30 वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न नक्कीच सुटेल असा आशावाद जनतेत निर्माण झाला आहे.
साकळाई उपसा जलसिंचन योजना श्रीगोंदा आणि नगर तालक्यातील जिरायती गावांसाठी वरदान ठरणारी आहे. चिखली,कोरेगाव, घोसपुरी,सारोळा कासार,खडकी, जाधववाडी,वाळकी, शिरढोण,हिवरे झरे,बाबुर्डी बेंद, दहिगाव, साकत, वाटेफळ, देऊळगाव सिध्दी, तांदळी, वडगाव,रुई छत्तीसी, गुणवडी, मांडवगण, मठ पिंप्री,हातवळण, खांडगाव, महांडूळवाडी,कोळगाव, सुरेगाव, घुटेवाडी, कोतुळ, बांगर्डा या गावांमधील तब्बल 12 हजार हेक्टर क्षेत्र या योजनेमुळे ओलिताखाली येणार आहे आणि तेही अवघ्या 1.80 टीएमसी पाण्याच्या सहाय्याने. गेल्या 30 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून प्रत्येक निवडणुकीत या योजनेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून फक्त आश्वासनेच मिळाली होती .
पण डॉ.सुजय विखे खासदार झाल्यानंतर व महायुती सरकार राज्यात सत्तेत आल्यावर 2022 पासून त्यांनी या योजनेसाठी विशेष प्रयत्न केले.या योजनेच्या मार्गातील अनेक अडथळे क्रमाक्रमाने दूर करत या योजनेचे सर्व्हेक्षण काम 2024 मधे पूर्ण करून घेतले. त्यांनतर मात्र पाणी उपलब्ध प्रमाणपत्रासाठीचा प्रस्ताव आजतागायत जलसंपदा विभागाकडे मंजुरीसाठी पडून आहे. कुकडी प्रकल्पात पाणी उपलब्ध असतानाही साकळाई पाणी योजनेला पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मिळत नसल्याने लोकांमधे निराशेचे वातावरण तयार झालेले होते. पण आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी तर जलसंपदा खाते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आल्याने साकळाई उपसा जलसिंचन योजनेबाबतच्या लोकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
ओव्हर फ्लोच्या पाण्यावर साकळाई
1954 मध्ये घोड धरणासाठी केंद्रीय जल आयोगाने 10.40 टीएमसी पाणी साठा मंजूर केला आहे.पण त्या काळात घोड धरण फक्त 7.40 टीएमसी क्षमतेचे बांधले गेले आहे.त्यामुळे गेली 60 ते 65 वर्षांपासून दरवर्षी सरासरी 4 ते 5 टीएमसी पाणी ओव्हर फ्लो च्या स्वरूपात वाहून जात आहे.या ओव्हर फ्लो पाण्या मधील 1.80 टीएमसी पाणी साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी मिळावे यासाठीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पडून आहे.
निश्चित पाठपुरावा करणार -आमदार विक्रमसिंह पाचपुते
साकळाई पाणी योजनेसाठी माजी मंत्री बबनराव पाचपुतें पासून आम्ही प्रयत्नशील आहोत.पण आजवर साकळाई पाणी प्रश्न सोडवण्यापेक्षा अडविण्याचा प्रयत्न जास्त झाला .पण आता साकळाई पाणी योजनेसाठी सकारात्मक असणारे सरकार सत्तेत आहेत. मी नागपूर अधिवेशनात या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. साकळाईबाबत जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निश्चित पाठपुरावा केला जाईल.
Tags
अहिल्या नगर