नगर संवाद - शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हाती मोफत पाठ्यपुस्तके हा शासनाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. पुस्तके हे आयुष्याला...
शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हाती मोफत पाठ्यपुस्तके हा शासनाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
पुस्तके हे आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात.त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलशी नव्हे तर पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे असे प्रतिपादन अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार प्रकाश गांधी यांनी केले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा विश्रामबाग येथे आज शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण आणि स्वागत समारंभ घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या सल्लागार मंडळाच्या सदस्या सुनीता मुथा त्यांच्या सोबत होत्या.
यावेळी बोलताना प्रकाश गांधी म्हणाले की सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता पण कुशाग्र होत चालली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमधे काहीतरी विशेष कलागुण असतात.त्यामुळें आपण आपल्या संस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करत असतो. विद्यार्थी कुशाग्र बुद्धिमत्ता असल्याने विद्यार्थी सहजपणे संगणक आणि मोबाइलचा वापर करतात.पण अनेक विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेले आहेत.घरी गेले की मोबाइल साठी पालकांशी हट्ट करतात.पण मोबाईल नव्हे तर तुमच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम पुस्तके करतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे.
सुनीता मुथा या बोलताना म्हणाल्या की मुलांनी सात्विक आहार घेतला पाहिजे. तोंडाला पाणी आणणारे पिझ्झा ,बर्गर, वडापाव असे अनेक पदार्थ आपल्याला आकर्षित करतात पण यांमुळे आपल्या शरीरात अनावश्यक घटक जातात आणि त्याचा त्रास आपल्याला होतो. त्यामुळे शाळेत डबा आणताना त्यात भाजी पोळी यांसारखेच पदार्थ आणावेत. यावेळी पहिलीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प आणि टाळ्यांच्या गजरात शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वागत केले.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मीना पवार, गणेश बुरा, संगीता भंडारी, जितेंद्र निकम, रवी चांदेकर, पारुनाथ ढोकळे, लीना पाटोळे, दीपक कराळे, कविता धर्माधिकारी, योगिता कासार, वैभव मदने, मयूर धाडगे, योगिता बनकर, जयश्री वाघ, अश्विनी कोल्हे, ऋत्विक देसाई, शौकत शेख, विशाल देशपांडे आदी उपस्थित होते.
COMMENTS