नगर संवाद
इतिहासकाळापासून महाराष्ट्राला फितुरीचा शाप आहे. वर्तमानातही तो सुरूच असल्याने राज्याचे नुकसान झाले आहे असे परखड मत इतिहासकार साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. प्रबोधन मंच व स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय चिचोंडी पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
पाटील म्हणाले, शूर संभाजीराजे फक्त फितुरीमुळे पकडले गेले. छत्रपती शिवराय व शंभूराजांचे नाते जिवाशिवाचे होते. परंतु काही मराठी नाटककारांनी इतिहास रंजक करण्याच्या नादात शंभूराजे व कवी कलशाच्या प्रतिमेचे विपर्यस्त चित्रण करून त्यांना उभे बदफैली ठरवले. मुळात शंभूराजे यांनी आपल्या कारकिर्दीत एकशे बारा लढाया केल्या. त्यातल्या एकाच लढाईत त्यांचा पराभव झाला. पकडले गेले तेव्हा औरंगाजेबने त्यांना किल्ले मागितले आणि धर्मांतर करण्याची अट घातली. परंतु स्वाभिमानी संभाजीराजे यांनी ही तडजोड फेटाळली. हंबीरराव मोहिते जिवंत असते तर संभाजी पकडलेच गेले नसते असा दावा त्यांनी यावेळी केला.
छावा चित्रपटाविषयी बोलताना पाटील म्हणाले, सिनेमात खूप काही मांडलं तरीही खूप काही उरलं. संभाजी हा विषय एका चित्रपटात मावणारा नाही. परंतु छावा चित्रपटामुळे फक्त महाराष्ट्राला माहित असलेले शंभूराजे सर्व जगाला माहित झाले.
यावेळेस चिचोंडी पाटील येथील नवोदित लेखक मारुती खडके यांच्या ‘परांगणा’ या कादंबरीचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. या कादंबरीचे मुखपृष्ठ रेखाटणाऱ्या इयत्ता बारावीतील सुष्टी कृष्णा पाचारणे तर छावा चित्रपटातील गीत गाणाऱ्या श्रीनिधी व श्रीनव्या महेश वाघमारे या मुलींचे पाटील यांनी कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमर शेख, संतोष पवार, महादेव शेलार, आदिनाथ पवार, काशीनाथ बेल्हेकर, संतोष जाधव, नाना कोकाटे, संजय कोकाटे, महेश हजारे, बाबासाहेब वाडेकर, अशोक इंगळे, विजय कोकाटे, सुरेश खेडकर, प्रदीप तांबोळी, शिवाजी कोकाटे महादेव भद्रे, दत्तू गाडे, दत्ता देवकर आदींनी परिश्रम घेतले.
महिलांना अश्रू अनावर
विश्वास पाटील काही प्रसंग सांगताना भावूक झाले, ‘संभाजींराजे आपली पत्नी येसूबाईला पत्रातून म्हणतात, थोरल्या महाराजांनी स्वराज्य नावाचा हा कुकुंमतिलक आपल्या भाळी लावला आहे. माझ्या प्राणाचे काही झाले तरी चालेल. तू विधवा झाली तरी महाराष्ट्र सधवा राहायला हवा.’ संभाजी व येसूबाईमध्ये झालेला हा संवाद ऐकून उपस्थित महिलांना अश्रू अनावर झाले.
Tags
अहिल्या नगर