लोकवर्गणीतून उभे राहिलेले श्री शैलम येथील अनोखे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिर जितेंद्र निकम आजवर अनेक परकीय आक्रमणा...
लोकवर्गणीतून उभे राहिलेले श्री शैलम येथील अनोखे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिर
जितेंद्र निकम
आजवर अनेक परकीय आक्रमणांनी उध्वस्त केलेली मंदिरे आणि जनतेची केलेली लूट आंध्र प्रदेशातील जनतेने अनुभवली होती. पण महाराष्ट्रातील
एक राजा येतो काय आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री शैलम येथील मल्लिकार्जुन शिव मंदिराचा जीर्णोद्धार करतो काय, ही घटनाच तेथील जनतेसाठी अनाकलनीय होती.त्यामुळे अशा लोकप्रिय राजाच्या आठवणी सदैव स्मरणात राहाव्यात या हेतूने श्री शैलम येथील जनतेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हयातील लोकवर्गणीमधून एक भव्य मंदिर उभे केले. आंध्र प्रदेशातील श्री शैलम येथील लोकवर्गणी मधून उभे राहिलेले भव्य श्री शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिर आजही दिमाखात उभे असून अखंड स्फूर्ती देत आहे.
दक्षिणेतील दिग्विज्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही आणि मुघलशाही यांचा एक एक प्रदेश काबीज करण्यास सुरुवात केली.त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज 6 ऑक्टोबर 1676 मध्ये पुन्हा मोहिमेवर निघाले.वाटेत कुतुबशाहीने केलेला सन्मान स्वीकारून छत्रपती गोवळकोंड्यावरुन आपल्या सैन्यानिशी दक्षिणेकडे निघाले. छत्रपती शिवाजी महाराज शिव भक्त होतेच.
त्यांना आंध्र प्रदेशातील श्री शैलम येथे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे मल्लिकार्जुन शिव मंदिर असल्याची माहिती मिळाली.दर्शनासाठी राजे आपल्या लवाजम्यासह श्री शैलम या ठिकाणी आले.
पण श्री शैलम येथील मल्लिकार्जुन शिव मंदिर पाहून राजांचे मन विशिष्ण झाले. कारण या मंदिराच्या अनेक भागांची पडझड झाली होती तर मंदिराच्या काही भागाचे बांधकाम देखील अपूर्ण होते.या भागात अनेक हिंदू सरदार असूनही मुघल आणि परकीय सत्तेच्या भीतीने या मंदिराकडे कोणी लक्ष देत नव्हते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तातडीने येथील जनतेला एकत्रित केले. कारागिरांना बोलावून येथील मंदिराचे अपूर्ण काम आणि झालेली पडझड दुरुस्तीचे आदेश दिले ,यासाठी निधीही दिला. छत्रपती शिवाजी महाराज जवळपास 10 दिवस श्री शैलम या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यावेळी त्यांनी मोठी ध्यानधारणा येथे केली.आपल्या वास्तव्याच्या काळातच त्यांनी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करून दिली.जाते वेळी त्यांनी संपूर्ण दुरुस्ती कामासाठी लागणारा निधी देऊ केला. याशिवाय राजांनी या ठिकाणी अन्नछत्र सुरू केले आणि येथील प्रजेची व्यवस्थाही लावली.
श्री शैलम येथील जनतेसाठी हे सर्व अनाकलनीय होते.आजवर परकीय आक्रमणांनी उध्वस्त केलेली मंदिरे आणि जनतेची केलेली लूट त्यांनी पाहिली होती.पण महाराष्ट्रातील एक राजा येतो काय आणि मंदिर जीर्णोद्धार करतो काय, जनतेची व्यवस्था लावतो काय, अशा प्रिय राजाला कायम स्मरणात ठेवण्यासाठी येथील जनतेने लोकवर्गणी मधून मल्लिकार्जुन मंदिराच्या जवळच एक भव्य श्री शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिर उभे केले.
आजही हे भव्य मंदिर या ठिकाणी दिमाखात उभे आहे.1984 च्या सुमारास या मंदिराचे नूतनीकरण केले गेले.या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज ध्यानधारणा करत असतानाची सुंदर मूर्ती आहे.त्यांच्या मागे श्री भ्रम रांभा देवीची मूर्ती आहे.श्री भ्रम रांभा देवी माता छत्रपती शिवाजी महाराज यांना एक तलवार देत असतानाचे एक शिल्प या ठिकाणी पहावयास मिळते. त्याखाली श्री भ्रम रांभा मातेने छत्रपती शिवाजी महाराज यांना एक तलवार दिल्याचा उल्लेख आहे.या ठिकाणी 2 शिव मंदिर असून त्यातील एक ध्यान मंदिर आहे.दुसऱ्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिजामाता, बाळराजे शंभू यांच्या सह अष्ट प्रधान मंडळाचा शिव दरबार शिल्प रूपात दाखविण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून चे त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग शिल्प रूपात दाखविण्यात आले आहेत. येथील शिल्प इतके रेखीव आहेत की त्यातून जिवंतपणा दिसून येतो.या शिल्पामधील मुर्तींच्या चेहऱ्यावरील आणि डोळ्यातील आनंद ,राग,क्रोध असे अनेक भाव स्पष्टपणे दिसून येतात.या शिल्पांच्या खाली तेलगू, इंग्रजी आणि मराठी भाषेत माहिती लिहिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक किल्ल्याच्या हुबेहुब प्रतिकृती या ठिकाणी पहावयास मिळतात.या मंदिराचा परिसर मोठा असून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. मंदिर आणि परिसरात स्वच्छता आणि शांतता अनुभवास मिळते. दरवर्षी शिव जयंती उत्सव या ठिकाणी थाटामाटात संपन्न होतो असे येथील स्थानिक लोक सांगतात. आपल्या महाराष्ट्रात पहावयास मिळत नाही एवढे भव्य श्री शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिर आंध्र प्रदेशातील श्री शैलम या ठिकाणी उभे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री शैलम येथील 10 दिवसांच्या वास्तव्यात आपल्या कार्यातून येथील जनतेच्या मनात जे स्थान निर्माण केले आहे ते मंदिर स्वरूपात येथे उभे असल्याचे दिसते.
COMMENTS